“खोट्या तक्रारींचा धाक दाखवून १ कोटींची मागणी – अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल”
अंबाजोगाई: राज्यभरात नामांकित असलेल्या यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी दाखल करून त्या मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी रेखा उत्तम वंजारे यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे सहगुत्तेदार चांगदेव शेप यांना ही खंडणी मागण्यात आली असून, या प्रकरणाने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी महिला भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची तालुका संघटक असल्याचे समोर आले असून, तिने पदाचा गैरवापर करत ही खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, यश कन्स्ट्रक्शन कंपनी सन २००७ पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत विविध रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांची कामे करत आहे. या कंपनीची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने रेखा वंजारे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आयकर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड आणि कोकण भवन येथील महामार्ग विभागाकडे खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारी अर्जांची पोच पावती व्हॉट्सॲपवर पाठवून कंपनीची आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती.
तक्रारीनुसार, रेखा वंजारे यांनी कंपनीचे सहगुत्तेदार चांगदेव शेप यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरून संपर्क साधला. या सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांनी १ कोटी रुपयांची रोख मागणी केली. या मागणीसाठी त्यांनी वारंवार फोन करून आणि व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून दबाव निर्माण केला होता. या संपूर्ण संभाषणाचे आणि खंडणीच्या मागणीचे पुरावे म्हणून ऑडिओ रेकॉर्डिंग्स पोलिसांना सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अंबाजोगाई शहर पोलिसांनी रेखा वंजारे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत. दरम्यान, या निमित्ताने विविध संघटनांचे पद मिरवून त्याआडून जिल्हाभरातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, गुत्तेदार यांना करण्यात येणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.






