अण्णाभाऊची लेखणी हा केवळ एक ऐतिहासिक ठेवा नसून ती एक क्रांतीची मशाल आहे- राजकिशोर मोदी
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याची लेखणी व त्यांचे साहित्य हे केवळ एक ऐतिहासिक ठेवा नसून ती एक क्रांतीची मशाल आहे असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौकात त्यांना अभिवादन करतांना बोलत होते.यावेळी राजकिशोर मोदी याच्यासोबत महादेव आदमाणे यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
जयंतीनिमित्त अभिवादन करतांना राजकिशोर मोदी पुढे म्हणाले की १ ऑगस्ट ही केवळ एक तारीख नाही, तर एका युगप्रवर्तक साहित्यिकाच्या जन्माची स्मृती आहे.
या दिवशी शोषितांच्या वेदना लेखणीतून पेटवून, हजारो-लाखो दुःखी जीवांना आत्मभान देणारे एक ‘लोकशाहीर’ जन्मास आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्याचे जनक होते.त्यांनी तमाशा आणि लोकनाट्याच्या माध्यमातून क्रांतीचे अनेक गीत गायले. संपूर्ण जगाच्या साहित्य विश्वात आपला एक आगळावेगळा ठसा उमटवला. १९२० साली सांगली जिल्ह्यातल्या वटेगाव या खेडेगावात जन्मलेल्या अण्णाभाऊंचे बालपण हे अत्यंत उपेक्षेचे असेच गेले. बालवयातच शिक्षणाचा मार्ग बंद झाल्याने मोलमजुरी करतांना त्यांना आयुष्याचा अस्सल अनुभव मिळाला आणि तेच वास्तव त्यांच्या लेखणीत झळकले असल्याचे मोदी यांनी याप्रसंगी नमूद केले. अण्णाभाऊ साठे यांनी लोक कलेसारख्या तमाशाला केवळ करमणुकीपुरते मर्यादित न ठेवता ते समाज जागृतीचे शस्त्र बनवले. त्यांच्या लेखणीचा प्रवास हा मानवाच्या आत्मसन्मानाचा प्रवास ठरल्या गेला आहे. अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या विचारांची ही ज्योत नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचे आपले कर्तव्य असल्याचे राजकिशोर मोदी यांनी उपस्थित आपल्या सहकार्यांना सांगितले.
अण्णाभाऊ साठे यांनी स्त्रीशक्तीच्या उत्थानासाठी, मजुरांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली. तिथे गेल्यावर त्यांनी बांधकाम मजूर, कामगार म्हणून काम केले. या कामातूनच त्यांना खऱ्या जीवनाची परीक्षा अनुभवयास मिळाली. या खडतर प्रवासातूनच त्यांच्या साहित्याला जीवन मिळाले. त्यांनी जीवनात जे अनुभवले तेच त्यांच्या साहित्यात अवतरले आहे अशी भावना देखील राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये त्यांच्या चौकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना बबन लोमटे, महादेव आदमाणे, अमोल लोमटे, धम्मा सरवदे, अशोक देवकर, सुदाम देवकर, अंकुश हेडे, खलील जाफरी, अकबर पठाण, गोविंद पोतंगले,आकाश कऱ्हाड, उज्जेन बनसोडे, कैलास कांबळे, विशाल पोटभरे, रोहन कुरे,संतोष चिमणे, अमित परदेशी, रोहित साठे, शरद काळे, सिद्धार्थ साबळे, मुन्ना वेडे, मुनिर शाह, गुड्डू जोगदंड यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.