होळ येथील धक्कादायक प्रकार; पुरवठा विभाग ‘मॅनेज’ असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
प्रतिनिधी केज:-दि.१५ : तालुक्यातील होळ येथील उपसरपंच बाळासाहेब घुगे यांच्या राशन दुकानातून काळा बाजारात जात असलेले ४४ क्विंटल स्वस्त धान्य धारूर पोलिसांनी पकडले. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर खडबडून जागे झालेल्या केजच्या पुरवठा विभागाच्या तपासणी पथकाने चक्क राशनमाफियाच्या घरात बसूनच पंचनामा केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या प्रकारामुळे कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
होळ येथील स्वस्त धान्याचा काळाबाजार धारूरमध्ये उघडकीस आला. उपसरपंच बाळासाहेब घुगे यांच्या कोलंबस सहकारी संस्थेअंतर्गत त्यांचा भाऊ अशोक तुकाराम घुगे हा राशन दुकान चालवतो. त्याने राशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठवल्याची कबुली वाहन चालकाने दिली. तसा धारूर पोलिसांनी पुरवठा विभागाला अहवाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर राशन दुकानाची केजच्या तालुका पुरवठा विभागाकडून तपासणी करण्यात आली. या पथकात तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी सुजाता मेश्राम, श्रीमती.उंबरे, मंडळ अधिकारी संतोष देशमुख, तलाठी नामदेव उगले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मात्र पंचनामा करण्यासाठी संबंधित दुकानात न जाता, त्यांनी थेट राशनमाफियाच्या घरातच बसून पंचनामा सुरू केला. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तहसीलदारांना कळवले. तहसीलदारांनी त्वरित हस्तक्षेप करत पथकातील अधिकाऱ्यांना खडसावले. त्यानंतर दुकानात बसून पंचनामा पूर्ण करण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे होळ येथील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट
माफियांच्या समोर खरे जवाब आलेच नाहीत!
पंचनाम्यासाठी राशनमाफियाच्या नातेवाईकांसह काही नागरिकांना घरासमोर बोलावून त्यांच्या जबाब नोंदवण्यात आले. एकूण २३ जणांचे जबाब घेण्यात आले असले तरी, दबावाच्या वातावरणामुळे अनेकांना खरी माहिती देता आली नाही, अशी चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. त्यामुळे तहसीलदारांनी तहसीलमध्ये जवाब घ्यावेत, मागणी ग्रामस्थांमधून केली जाणार आहे.
कोट
राशन दुकानदाराच्या घरात बसून पंचनामा केला जात असल्याचा आरोप होता. त्याअनुषंगाने तहसीलदारांना कळविले आहे. योग्य ती कार्यवाही केली जाईल.
– शिवकुमार स्वामी, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड
कोट
माझ्याकडे राशन दुकानदाराच्या घराचा व्हिडिओ आला. त्यानंतर अधिकाऱ्यांना तत्काळ दुकानातूनच पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. पारदर्शक पद्धतीने चौकशी करू.
– राकेश गिड्डे, तहसीलदार, केज