भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा बनले कारखानदार स्व. गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केला होता कारखाना
अंबाजोगाई प्रतिनिधी:-अंबाजोगाईपासून जवळच असलेला रेणापूर तालुक्यातील पन्नगेश्वर साखर कारखाना आता भाजपचे युवानेते अक्षय मुंदडा हे संचालक असलेल्या विमल अॅग्रो लमिटेडच्या ताब्यात आला आहे.मुंदडांनी शनिवारी (दि.३१)अधिकृतपणे ताबा घेतला. येत्या हंगामात गाळप सुरू करणार असल्याची माहिती आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे स्थित पनगेश्वर साखर मिल्स लिमिटेड या खासगी साखर कारखान्याची धुरा आता भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या विमल अॅग्रो लिमिटेडकडे आली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या या कारखान्याचे अध्यक्षपद प्रज्ञाताई मुंडे यांच्याकडे होते. मात्र काही काळापासून कारखाना आर्थिक अडचणीत सापडला होता.६ बँकांचे कोट्यवधींचे कर्ज थकित असल्याने कारखाना दिवाळखोरीत गेला आणि न्यायालयीन लिलावाची प्रक्रिया पार पडली.याच प्रक्रियेतून विमल अॅग्रो लिमिटेडने कारखाना घेतला. या संपूर्ण प्रक्रियेसाठी राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अक्षय मुंदडा यांना पाठिंबा दिला. मुंदडा यांनी कारखान्याचा अधिकृत ताबा घेतला. यावेळी मुंडदांच्या निकटवर्तीयांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान पुढील गळीत हंगामात कारखाना सुरू करण्याची तयारी असून यामुळे लातूर जिल्ह्यासह केज, परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
मुंदडा घराणेही कारखानदार म्हणून ओळखले जाणार
केज मतदारसंघातील अनेक राजकीय कुटुंबांकडे शिक्षण संस्था, सहकारी संस्था, कारखाने असा मोठा पसारा आहे. मात्र मुंदडा यांच्याकडे केवळ एक-दोन शिक्षण संस्था व डेअरी प्रकल्प होता. आता पनगेश्वर साखर कारखान्याच्या ताब्यामुळे अक्षय मुंदडा यांची ‘कारखानदार’ अशी ओळखही झाली आहे. त्यामुळे आगामी राजकारणात त्यांना फायदा होणार आहे.