परभणीः सध्या आकाशात गेल्या काही दिवसापासून दिसत असलेल्या धूमकेतूचे दर्शन अखेर परभणीकरांना झाले.गेले काही दिवस ढगाळ वातावरणामुळे पश्चिम क्षितिजावर सध्या दिसत असलेल्या धूमकेतूची दृश्यमानता कमी असल्यामुळे हा धमकेतू सतत हुलकावणी देत होता. पण काल जिंतूर तालुक्यातील मैनापुरी टेकडीवर या धूमकेतूचे निरीक्षण करण्यात आले व अखेर त्याचे छायाचित्रही टिपण्यात परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सदस्यांना यश आले आणि या दुर्मिळ खगोलीय घटनेचे साक्षीदार होता आले.
या धमकेतूचे नाव Comet C/2023 A3 (Tsuchinshan–ATLAS) असे आहे. धूमकेतू साधारणत: सूर्यमालेच्या प्लूटो च्या पलीकडे असलेल्या उर्ट क्लाउड या भागातून येतात, असे मानण्यात येते. हे धूमकेतू म्हणजे दगड, माती, बर्फाचे गोळे असतात जे शेकडो फूट व्यासाचे असू शकतात. सध्याचा हा धूमकेतू कदाचित उर्ट क्लाउड भागाच्या सुद्धा बाहेरून आलेला असू शकतो असा अंदाज आहे. तब्बल ८० हजार वर्षांची कक्षा असलेल्या या धूमकेतूने शनिवारी (१२ ऑक्टोबर) पृथ्वीपासून सर्वांत कमी अंतरावरून (सुमारे सात कोटी किलोमीटर) प्रवास केला. या धूमकेतूचे नाव C/2023 A3 (Tsuchinshan–ATLAS) आहे. C म्हणजे अनियमित कालावधीचा म्हणजे Non-periodic comet, 2023 म्हणजे जेव्हा तो पहिल्यांदा नोंद केला गेला किंवा शोधला गेला ते वर्ष, A3 म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शोधला गेलेला तिसऱ्या नंबर चा ऑब्जेक्ट. Tsuchinshan त्सुचीनशान म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील Purple Mountain Observatory ने याचा शोध लावला त्याचे चायनिज भाषेतले नाव. ATLAS म्हणजे Asteroid Terrestrial-impact Last Alert System टेलिस्कोप ज्याच्या साहाय्याने हा धूमकेतू शोधला गेला.
धुमकेतू कसा पाहावा?
सध्या धूमकेतू सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर दिसू लागला आहे. सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिज निरभ्र असल्यास साधारणपणे ३० मिनिटांनंतर धूमकेतूचे दर्शन घडू शकते.धूमकेतू उघड्या डोळ्यानेही दिसेल पण जर द्विनेत्री (बायनोकुलार) असल्यास अजून ठळक दिसेल. सूर्य मावळल्यानंतर पश्चिम दिशेकडे पाहत असताना शुक्र तार्याच्या उजवीकडून थोडा वर हा धुमकेतू दिसत आहे. पुढील काही दिवस या धूमकेतूचे शहराबाहेरून साध्या डोळ्यांनी दर्शन घडू शकते. 25 ऑक्टोबर पर्यंत हा धूमकेतू दिसणार आहे. धूमकेतू दिसणे ही केवळ एक खगोलीय घटना आहे, त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा मानू नये. त्यामुळे जास्तीत जास्त खगोलप्रेमींनी, शिक्षकांनी,विद्यार्थ्यांनी या धूमकेतूच्या निरीक्षणाचा आनंद घ्यावा व या दुर्मिळ खगोलीय घटनेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे करण्यात आले आहे.