परळी मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह १४ जणांनी दिल्या मुलाखती
अंबाजोगाई प्रतिनिधी:-बीड जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असणारांच्या मुलाखती गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी दिवसभर काॅंग्रेस भवन, अंबाजोगाई येथे घेण्यात आल्या. यात परळी मतदारसंघातून स्वतः जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह जिल्हाभरातून १४ सक्षम व इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. अतिशय शांततेत मुलाखत प्रक्रिया पार पडली.
काॅंग्रेस तर्फे नेमण्यात आलेले पक्ष निरीक्षक तथा माजी आमदार ॲड.रामहरी रूपनवर यांनी या मुलाखती घेतल्या. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे व शहराध्यक्ष असिफोद्दीन खतीब हेही उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांसाठी या मुलाखती झाल्या. बीड पासून सुरूवात झाली. डॉ.दिलीप मोटे, सहदेव हिंदोळे असे दोन जण बीड मधून इच्छुक आहेत. तर परळीमधून स्वतः जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, वसंतराव मुंडे, ऍड.अनिल मुंडे हे इच्छुक आहेत. केजमधून ऍड.अनंतराव जगतकर, रविंद्र दळवी, नितीन हत्तीअंबिरे, राहुल वाव्हळे, दत्ता कांबळे, ऍड.मारूती सावळकर असे सहा जण इच्छुक आहेत. तसेच आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातून छगन खटके पाटील, रविंद्र ढोबळे हे दोघे जण इच्छुक आहेत. गेवराई मतदारसंघातून मनोहर चाळक हे इच्छुक आहेत. माजलगाव मतदारसंघासाठी कोणी मुलाखतीसाठी उपस्थित नव्हते. बीड जिल्ह्यातील बीड, परळी, केज, गेवराई व आष्टी – पाटोदा – शिरूर मतदारसंघातून एकूण १४ जणांनी कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी उमेदवारी मागितली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पक्ष निरीक्षक तथा माजी आमदार ॲड.रामहरी रूपनवर यांनी सांगितले की, राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमुळे देशातील वातावरण बदलले आहे. तरूणांमध्ये नवचैतन्य व उत्साह संचारला आहे. लाट निर्माण झाली आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली पाहिजे, काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नाही. अशी भावना समाजात निर्माण झाली आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसने निवडणूक लढविली पाहिजे, उमेदवार उभे केले पाहिजेत असा काँग्रेस पक्ष नेतृत्वाचा मानस, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मागणी आहे. म्हणून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीने बीड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते, ते अर्ज प्रदेश कार्यालयाकडे आल्यानंतर बीड जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांची विधानसभानिहाय यादी पाठविण्यात आली. या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या निर्देशानुसार आणि प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने बीड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी माझी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मी गुरूवारी दिवसभर १४ जणांच्या वन-बाय-वन मुलाखती घेतल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काँग्रेसकडून लढणाऱ्या इच्छुकांची मोठी संख्या आहे. मुलाखतींना मिळालेला प्रतिसाद चांगला व सकारात्मक होता. मुलाखतींबाबतचा गोपनीय अहवाल ११ ऑक्टोबर पर्यंत प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे, असे सांगून बीड हा पुर्वीपासून काॅंग्रेस विचारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात काॅंग्रेस मजबूत आहे. महाविकास आघाडीकडे आम्ही बीड, परळी व केज जागांची मागणी लावून धरणार आहोत. या तीन ही मतदारसंघात अतिशय सक्षम व निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाने आघाडी धर्म पाळत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे इमानेइतबारे काम केले. उमेदवार निवडून आणला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड, परळी व केज या मतदारसंघात काँग्रेसचा बुथनिहाय मतदानाचा परफॉर्मन्स चांगला आहे. ग्राऊंड लेवलवर जावून आम्ही माहिती संकलित केली आहे. बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडे संघटनकौशल्य असलेला अध्यक्ष, मजबूत टीम, संघटनात्मक बांधणी, सक्षम व निवडून येण्याची क्षमता, उमेदवारांना निवडून आणण्यासाठीची मतदान प्रणाली, तयारी व साधनसामुग्री असलेले सक्षम उमेदवार आहेत. महाविकास आघाडी व काँग्रेससाठी बीड जिल्ह्यात अतिशय चांगले वातावरण आहे. म्हणून मी पक्ष निरीक्षक म्हणून बीड जिल्ह्याचा चांगला अहवाल प्रदेश कार्यालयाकडे सादर करणार आहे. अशी माहिती पक्ष निरीक्षक ऍड.रूपनवर यांनी दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नवनाथराव थोटे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंभुराजे देशमुख, संजय काळे, अशोक देशमुख, शेख मुख्तार (बागवान), बाळासाहेब जगताप, रोहिदास निर्मळ, अक्षय देशमुख, समदभाई कुरेशी, किरण उबाळे आदींसह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*विधानसभेसाठी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार :*
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सहा विधानसभा मतदारसंघात जे-जे इच्छुक उमेदवार होते. त्या सर्वांच्या मुलाखती घेण्यासाठी ऍड.रूपनवर साहेब यांनी पक्ष निरीक्षक म्हणून गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळ पासून मुलाखती घेतल्या आहेत. बीड जिल्हा काँग्रेसकडे १४ उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासंदर्भात ते इच्छुक असलेल्याचे सांगत आपला कार्य अहवाल सादर केला. आपण आपल्या मतदारसंघात कसे सक्षम आहोत. हे त्यांनी दाखवून दिले आहे. एकूणच बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडे निवडून येण्याची क्षमता असलेले सक्षम उमेदवार आहेत. राष्ट्रीय नेत्या खासदार सौ.रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही पक्षाकडे बीड, केज व परळी विधानसभा मतदारसंघ मागितले आहेत.
– राजेसाहेब देशमुख
(अध्यक्ष, बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)