एन. आय. शेख यांची माहिती
अंबाजोगाई:-अंबाजोगाई येथे लवकरच सेवानिवृत्त महसुल अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेह मिलन कार्यक्रम घेणार असल्याची माहिती सेवानिवृत्त नायब तहसीलदार एन. आय. शेख यांनी दिली.बीड येथील हॉटेल यशोदा येथे आयोजित करण्यात आलेल्या बीड जिल्ह्यातील सेवानिवृत्त महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेह मिलन कार्यक्रमात एन. आय. शेख यांनी ही माहिती दिली. बीड येथे नुकताच पहिला सेवानिवृत्त महसूल अधिकारी व कर्मचारी स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला . हा स्नेह मिलन कार्यक्रम सध्या महसूल विभागात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार संजय जिरंगे, वरिष्ठ लिपिक राहुल शेटे, आणि महसूल सहाय्यक इंद्रजीत शेळके, वडवणी येथील शिक्षक शेख सर आणि इतर दोन सहकारी यांनी आयोजित केला होता.
हा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा अभूतपूर्व असा हा कार्यक्रम सर्वांनाच भावला. सर्व अधिकारी कर्मचारी एकमेकांना बऱ्याच दिवसांनी- वर्षांनी समोरासमोर पाहून भारावून गेले होते. कोणी हातात हात मिळवत होते, तर बरेच जण एकमेकांची गळा भेट घेत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सेवानिवृत्त तहसीलदार यांच्या कारकिर्दीत ज्यांनी लिपिक म्हणून कामाची सुरुवात केली असे सेवानिवृत्त नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी वगैरे त्यांचे पाय धरताना मागे पुढे पाहत नव्हते, कारण अशा सुज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला शिकायला मिळाले असे काही जणांनी त्यांच्या मनोगतात बोलून दाखवले.
या स्नेह मिलन कार्यक्रमासाठी विशेष करून सेवानिवृत्त तहसीलदार एस डी सोनवणे, कांतीलाल जी सानप, अशोकराव नांदलगावकर, तसेच सेवानिवृत्त अप्पर कोषागार अधिकारी अशोकराव पिंगळे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार शंकर बुरांडे व अनेक सेवानिवृत्त नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अव्वल कारकून, तलाठी इत्यादी असे एकूण ५० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात संजय जिरंगे यांचे वडवणी येथील सहकारी शेख सर यांनी काही सुमधुर गीते सादर करून सर्वांचा उत्साह वाढवला. सेवानिवृत्त नायब तहसीलदार अशोक मिरगे यांनी आपल्या वात्रटिका सादर करत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत उत्तम रीतीने पार पाडले. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना सेवानिवृत्त नायब तहसीलदार एन. आय. शेख यांनी अशाच पध्दतीचा दिमाखदार स्नेह मिलन कार्यक्रम अंबाजोगाई येथे लवकरच आयोजित करण्यात येईल असे सांगितले.