संवाद हृदयरोगाशी व सी.पी.आर. प्रात्याक्षिक
अंबाजोगाई -: दैनंदिन जीवन शैलीत बदल केल्यास हृदयरोग टाळता येवू शकतो. मात्र यासाठी स्वतःमध्ये बदल करून आहार-विहार व व्यायाम दैनंदिन गरजेचा आहे. असे प्रतिपादन लातूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.संजयकुमार शिवपुजे यांनी केले.येथील घुगे हार्ट अॅण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व इंडियन मेडीकल असोसिएशन यांच्या वतीने जागतीक हृदयदिन व घुगे हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी सायंकाळी आद्यकवी मुकुंदराज सभागृहात संवाद हृदयरोगाशी व सी.पी.आर.प्रात्याक्षिक या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.संजयकुमार शिवपुजे बोलत होते. या उपक्रमासाठी मुंबई येथील सी.पी.आर.तज्ञ डॉ.ऐश्वर्या लाहोटी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे रोगप्रतिबंधक आणि उपचार सल्लागार हरिष मोटवाणी होते. तर व्यसापीठावर आ.नमिता मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, संयोजक डॉ.नवनाथ घुगे, रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी यांची उपस्थित होती. यावेळी बोलताना डॉ.संजय शिवपुजे म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसाचे संपुर्ण जीवनशैली चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. विनाकारण निर्माण होणारे ताणतणाव, वाढती व्यसनाधिनता, धुम्रपान यामुळे कमी वयात हृदयरोग बळावू लागला आहे. देशात ३३ टक्के मृत्यू केवळ हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतात. हे प्रमाण जीवनशैलीत बदल केल्यास निश्चित परिवर्तीत करता येते. मात्र त्यासाठी दैनंदिन व्यायाम, योग्य आहार, योगासने, आवाड जोपासणे अशा विविध माध्यमातून मन व शरिर निरोगी राहिल्यास हृदयरोग टाळता येतो. यावेळी त्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना हृदयरोगाच्या संदर्भातून सविस्तर माहिती विषद केली. यावेळी अध्यक्षसीय समारोप हरिष मोटवाणी यांनी केला. तर आ.नमिता मुंदडा, राजकिशोर मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिपप्रजवलन व धन्वंतरी पुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नवनाथ घुगे यांनी केले. तर संचलन प्रा.रमेश सोनवळकर यांनी तर उपस्थितांचे आभार धनराज सोळंकी यांनी मानले. या कार्यक्रमास महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होती.
सी.पी.आर.च्या माध्यमातून मिळते जीवदान-:
हृदयरोगाचा झटका आल्यानंतर बेशुद्ध होवून पडलेल्या व्यक्तीला सी.पी.आर.हा प्रथमोपचार कोणीही देवू शकतो. जोपर्यंत रूग्णवाहिका येत नाही. अथवा रूग्णालयात त्या व्यक्तीला नेईपर्यंत त्या रूग्णाला सी.पी.आर.दिला तर त्याला जीवदान मिळू शकते. अशा सी.पी.आर.च्या माध्यमातून अनेक रूग्णांना जीवदान मिळालेले आहे. या सी.पी.आर.चे प्रात्याक्षिक उपस्थितांना डॉ.ऐश्वर्या लाहोटी यांनी दिले.