उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा अंबाजोगाईच्या मेळाव्यात निर्धार
अंबाजोगाई प्रतिनिधी:-शिवसर्वेक्षण अभियानांतर्गत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार विधानसभा निहाय स्रीशक्ती संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी केज विधानसभा मतदार संघाचा मेळावा शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, अस्मिताताई गायकवाड, संपर्क प्रमुख परशुराम जाधव, संपदाताई गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुका प्रमुख बालासाहेब शेप यांच्या आयोजनात अंबाजोगाई येथील मुकुंदराज सभागृह येथे पार पडला. यावेळी सहसंपर्क डॉ. लक्षराज सानप, जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते हे उपस्थित होते.
तत्पूर्वी, मोरेवाडी चौकापासून उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची उघड्या जीपमध्ये रॅली ही कार्यक्रमस्थळापर्यंत काढण्यात आली. यावेळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुकुंदराज सभागृहात भाषणाच्या वेळी उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी केज विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांचे कौतुक करीत संघटनात्मक बांधणी व निष्ठेला शाबासकी दिली. त्याचबरोबर केज विधानसभेच्या दोन दिवसीय दौऱ्यात अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन शिवसैनिकांच्या मनातील भावना जाणून घेतल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीकडून केज विधानसभेची जागा मशाल चिन्हावर शिवसेनेला सोडवून घेण्याकरिता सर्व ताकदीने शेवटपर्यंत प्रयत्न करणारच असे ठामपणे आश्वासन मेळाव्यात दिले. यावेळी महिला पदाधिकारी व शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. मेळाव्यामध्ये महिला, युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यासह उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णी, नारायण सातपुते, तालुका प्रमुख बालासाहेब शेप, अशोक जाधव, शहर प्रमुख अशोक हेडे, राजेश विभूते, तात्या गोरे, जिल्हा सचिव रोहित कसबे, संघटक श्रीधर गरड, महिला आघाडीच्या डॉ. नयनाताई सिरसट, जयश्रीताई पिंपळे, राधाताई ढाकणे, रेखाताई घोगावे, आश्विनीताई बडे, प्रमिलाताई लांडगे, युवा सेनेचे अक्षय कदम, किशोर घुगे, विष्णू धायगुडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घेतली. सदरील मेळाव्यास बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशतात्या गालफाडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.