दोन महिन्यांपूर्वी निवडून आलेले नगरसेवक ‘आम्हीच निधी आणला’ म्हणत विकासकामांवर दावा; कर्मचाऱ्यांनाही दबाव टाकल्याची चर्चा
अंबाजोगाई प्रतिनिधी:- नगरपरिषद निवडणूक होऊन अवघे दोन महिने उलटले असताना अंबाजोगाई शहरातील विकासकामांवर श्रेय घेण्याचा प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या विकासात्मक आणि मूलभूत सुविधांच्या कामांचे श्रेय काही नव्याने नुकतेच निवडून आलेले नगरसेवक स्वतःकडे घेत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही नगरसेवकांकडून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. “आम्हाला विचारल्याशिवाय प्रभागात येऊ नका आणि कोणतेही काम करू नका,” अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे, “निवडणुकीत आमचा मोठा खर्च झाला आहे, आमच्याकडेही लक्ष द्या,” असे सांगत काही नवनिर्वाचित नगरसेवकांकडून सुरू असलेल्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. या प्रकारामुळे शहराच्या विकास प्रक्रियेलाच खोडा घालण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान,शहरातील रस्ते, नाली, पथदिवे, पाईपलाईन आणि इतर मूलभूत सुविधांची कामे सुरू असताना संबंधित नगरसेवकांकडून “ही कामे आम्हीच मंजूर करून आणली” असा गौगवा केला जात आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, ही सर्व कामे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांनी शासनाकडून मंजूर करून आणलेल्या निधीतूनच सुरू आहेत. आमदार नमिताताई मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अंबाजोगाई शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्याच निधीतून विविध विकासकामे प्रत्यक्षात सुरू आहेत. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडून श्रेय घेण्याच्या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीनंतर आज प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा, ३१ नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांची पहिली सर्वसाधारण बैठक नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीत शहरातील प्रलंबित कामे, विकास आराखडा आणि आगामी नियोजनावर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालांतराने नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत, गेली पंचवीस वर्षे अंबाजोगाई नगर परिषदेवर सत्ता असलेल्या मा.नगराध्यक्ष मोदी पितापुत्रांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. नगरपरिषदेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आज होणाऱ्या या पहिल्याच बैठकीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील का? याकडे सर्व अंबाजोगाईकरांचे लक्ष केंद्रित झाले आहे.






