पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे आ. नमिता मुंदडा यांची मागणी
अंबाजोगाई : राज्यात सध्या कुरेशी समाजाच्या बंदमुळे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जनावरांची खरेदी-विक्री ठप्प असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा आणि देखभालीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे तातडीने गौशाळांना आणि पांजरापोल संस्थांना आर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी केली आहे.
जय हिंद गोरक्षण गौशाळा, कानडीमाळी ता. केज या संस्थेच्या वतीने आलेल्या निवेदनाच्या आधारे आमदार मुंदडा यांनी पशुसंवर्धन विभागाकडे निवेदन सादर केले आहे. जनावरांची योग्य देखभाल करता यावी म्हणून गौशाळा व पांजरापोल संस्थांना १५० रुपये प्रति पशु प्रतिदिन अनुदान मंजूर करावे, अशी या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. ही योजना केवळ देशी गायीपुरती मर्यादित न ठेवता बैल, म्हैस, बकरी यांसारख्या सर्व जनावरांवर लागू करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.
जनावरांची संख्या वाढत असताना चारा व औषधोपचार यांसाठी लागणारा खर्च भागवणे अशा संस्थांना शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने निधी वितरित करून शेतकरी व गोरक्षण संस्थांना दिलासा द्यावा, असे आमदार मुंदडा यांनी म्हटले आहे.
यासोबतच गौशाळांनी परिसरातील शेतकऱ्यांना मोफत गोबर देऊन नैसर्गिक शेतीला चालना द्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. यामुळे जैविक शेतीला बळ मिळून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होईल, असे आमदार मुंदडा यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. सध्याची परिस्थिती गंभीर असून शासनाने त्वरीत उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी या पत्राद्वारे केली आहे.