रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा
अंबाजोगाई-:समाजात जे उपेक्षित आहेत जे वंचित आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी रोटरीने पुढाकार घ्यावा त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेवून कार्य करावे अशी अपेक्षा रोटरीचे भावी प्रांतपाल जयेश पटेल यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी परिचय सभागृह येथे रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयेश पटेल बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कल्याण काळे तर व्यासपीठावर उपप्रांतपाल प्रविण देशपांडे, रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित होणारे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षा प्रा.रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी, माजी सचिव धनराज सोळंकी, श्रीमती पारूल पटेल, शर्मिला देशपांडे, शोभा खडकभावी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जयेश पटेल म्हणाले की जगातुन पोलिओ निर्मुलनाचे काम रोटरी क्लबने केले. त्याच धर्तीवर आता कॅन्सर निर्मूलनासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. अंबाजोगाई व लातूर या ठिकाणी महिलांची तपासणी करून या आजारापासुन महिलांना कसे रोखता येईल.याबाबत विविध उपाययोजना राबविणयात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अंबाजोगाई रोटरी क्लबने आपल्या कार्यातून स्वतःची नवी ओळख व उंची निर्माण केली आहे.आगामी काळात क्लबने लोकांच्या समस्या लक्षात घेवून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रविण देशपांडे यांनी रोटरी क्लबच्या कार्यास शुभेच्छा देवून काम काजासाठी आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नवनिर्वाचित अध्यक्षा रोहिणी पाठक यांनी वर्षभरात राबविण्यात येणार्या सर्व उपक्रमांची माहिती दिली. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक उपक्रम राबवून अंबाजोगाई शहरातील उपेक्षितांना व वंचितांना न्याय देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.मावळते अध्यक्ष कल्याण काळे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी मावळते अध्यक्ष कल्याण काळे यांनी नूतन अध्यक्षा रोहिणी पाठक यांना पदभार सोपविला तर मावळते सचिव धनराज सोळंके यांनी नूतन सचिव मंजुषा जोशी यांच्याकडे पदाचा कार्यभार सुपूर्द केला.या प्रसंगी रोटरी क्लबमध्ये नव्याने आलेल्या सदस्यांचा व यावर्षी विविध पदांवर निवड झालेल्या. पदाधिकार्यांचे स्वागत प्रांतपाल व उपप्रांतपाल यांच्या हस्ते झाले. रोटरी क्लबचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने गेल्या २५ वर्षात अध्यक्ष राहिेलेल्या माजी अध्यक्षांचा सन्मान क्लबच्या वतीने करण्यात आला. रोटरी क्लबच्या वतीने काढण्यात आलेल्या सहयोग या अंकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वारकरी दिंडीने कार्यक्रमास प्रारंभ झाला.स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या पर्यावरण व जागर दिंडीत उपस्थित मान्यवर सहभागी झाले होते. दिप्रपज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे संचलन प्रा.संतोष मोहिते व स्वरूपा कुलकर्णी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मंजुषा जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील सर्वस्तरातील महिला व नागरिक उपस्थित होते.