राजकिशोर मोदी यांच्या यशस्वी मध्यस्थीने अंत्यसंस्कार पार पडले
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील लिंगायत समाजाला अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या समाजबांधवांनी मृतदेह नगर परिषद कार्यालयात आणून तीव्र आंदोलन केले. स्मशानभूमीसाठीची जागा पुरातत्व विभागाने ताब्यात घेतल्यामुळे ही गंभीर अडचण निर्माण झाली आहे. शहरातील लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नागरिक व अंबाजोगाई नगर परिषदेचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक गणपतअप्पा गुरुलिंगअप्पा वाघमारे (वय ७८) यांचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने समाजाने मृतदेह थेट नगर परिषद कार्यालयात आणून प्रशासनाच्या विरोधात निदर्शने सुरू केली.
या आंदोलनाची माहिती मिळताच अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्वरित घटनास्थळी येऊन समाजबांधवांशी संवाद साधला. त्यांनी उपजिल्हाधिकारी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियांका टोंगे, नगर रचनाकार ज्ञानेश्वर पोटे यांच्याशी फोनवरून चर्चा करून आणि नगर परिषदेचे कर्मचारी शेख इफ्तेकार यांना नगर पालिकेत बोलावून घेत दोन दिवसांत चलन भरून घेऊन मोजणीची कार्यवाही सुरू करण्याचे ठोस आश्वासन त्यांच्याकडून घेतले.
त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून समाजबांधवांनी आंदोलन मागे घेतले आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बराच वेळ कोणताही नगर परिषद अधिकारी किंवा कर्मचारी आंदोलनस्थळी न आल्यामुळे लिंगायत समाजाने प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.
लिंगायत समाजाच्या वतीने राजकिशोर मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांनी वेळेवर मध्यस्थी करत मृतदेहाची होणारी हेळसांड थांबवली आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, असे समाजबांधवांनी सांगितले.