७४ हजार रुपये हस्तगत; अंबाजोगाई शहर पोलीसांची तत्पर कारवाई
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोनपे अॅपद्वारे जबरदस्तीने रक्कम वसूल केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात अवघ्या दोन तासांत दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या कडून तब्बल ७४ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई दि. २२ जुलै २०२५ रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर करण्यात आली. कोळकानडी (ता. अंबाजोगाई) येथील फिर्यादी सोमनाथ मदन ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून फोनपे अॅपच्या माध्यमातून ८४ हजार ९ रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलीसांनी भा.दं.सं. कलम ३०९(४), ३(५) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान आरोपी अविनाश शंकर देवकर (वय ३२, रा. वडारवाडा, अंबाजोगाई) आणि अजहर अब्दुल रहमान पठाण (वय ३२, रा. पेन्शनपुरा, अंबाजोगाई) यांना स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाद्वारे तब्बल ७४ हजार ९ रुपये या आरोपींकडून जप्त केले असून, उर्वरित रक्कम मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रविकुमार पवार, आनंद शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार श्रीकृष्ण वडकर, मनोज घोडके, रवी कुमार केंद्रे, हनुमंत लाड, हनुमंत चादर, पांडुरंग काळे व भागवत नागरगोजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.