अंबाजोगाईकरांचा जीव धोक्यात !!
अंबाजोगाई:-अंबाजोगाई शहराला धनेगाव येथिल धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हे धरण केवळ अंबाजोगाई शहरांच्या काही किलोमीटर अंतरावर असूनही अंबाजोगाईकरांना आठ ते दहा दिवसातून एकदाच पाणी मिळते. विशेष म्हणजे, सध्या शहरात नळाला पिवळसर रंगाचे दूषित पाणी येत असून पिण्यासाठी अयोग्य आहे. अशा अवस्थेत अंबाजोगाईकरांचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग मात्र गाढ झोपेत आहे.
पिण्यासाठी दूषित पाणी, शेतीसाठी मुबलक पुरवठा
२०२४ च्या पावसाळ्यात धनेगाव धरण तुडूंब भरले होते. यामुळे यंदा अनेक गावांना शेतीसाठी कॉनॉलमधून मुबलक पाणी सोडण्यात आले. मात्र, अंबाजोगाईकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्कावर नगर परिषद प्रशासनाने पाय ठेवल्याचे चित्र दिसत आहे. धरण उशाला असूनही अंबाजोगाईकरांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे.
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात?
अंबाजोगाईकरांना मिळणारे पाणी दूषित, पिवळसर असल्याने पाणी पिण्यास आरोग्यास हानीकारक असल्याचे शहरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.पिण्याचे पाणी पिवळसर, गाळयुक्त असल्याने पाणी पिल्यास नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, पिण्याच्या पाण्यामुळे पोटाचे विकार, त्वचेचे आजार आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे.
नगर परिषद प्रशासन झोपेत।
अंबाजोगाईकरांच्या या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. धरण तुडूंब भरलेले असतानाही आठ ते दहा दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो, तोही दूषित आणि पिवळसर. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जनतेचा संताप उफाळला।
अंबाजोगाईकरांच्या संतापाचा पारा आता चढला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. पाण्याच्या या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडू शकतो. धरण भरलेले, पाणीही मुबलक, पण प्रशासनाची झोप मात्र अजूनही गाढच! अंबाजोगाईकरांच्या या पाण्याच्या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन पाण्याचा नियमित व स्वच्छ पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.