आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश
अंबाजोगाई : तालुक्यातील कोद्री – सनगाव – चनई – अंबाजोगाई या ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक गावांना जोडणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीला गती मिळणार असून, नागरिकांना प्रवासासाठी अधिक सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कोद्री – सनगाव – चनई – अंबाजोगाई रस्त्याची मागील काही कालावधीत अत्यंत दुरावस्था झाली होती. रस्त्यांवर जागोजागी खड्डे झाले होते. खड्ड्यांमुळे वाढलेली वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करत असून, हा मार्ग शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्याच्या सुधारण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राज्य शासन तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदने देण्यात आली होती. शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि केंद्रीय रस्ते निधीतून १५ कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आला. यातून अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेला आडस फाटा येथील संत ज्ञानेश्वर माउली चौक ते चनई फाटा हा तीन किमीचा मार्ग देखील चौपदरी, शंभर फुटांचा होणार आहे. तसेच, स्वाराती रुग्णालय परिसरातील बसवेश्वर चौक येथून आडस रोडच्या चौपदरीला जोडणारा मार्गही होणार आहे. हा रोड छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या वाहतुकीस व स्वाराती रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. लवकरच याची निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, कामाचा प्रारंभ करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावरील नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान होईल. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.