जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न
जानेवारी अखेर 154.35 कोटी खर्च
बीड, दि. 30:- सर्व प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका ठेवून काम केल्यास बीड बाबत सर्वत्र निर्माण झालेले वातावरण बदलेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. प्रतिमा बदलली तर बीडमध्ये गुंतवणूक येईल व रोजगार वाढेल असेही म्हणाले. श्री.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील नियोजन सभागृहात चालू वर्षाचा नियोजन आराखडा आणि त्यात आतापर्यंत झालेल्या खर्चाची स्थिती याचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात सर्वसाधारण योजनेचा आराखडा 484 कोटीचा असून अनुसूचित उपयोजना आराखडा 129 कोटींचा आहे. यासोबतच ओटीएसपी अंतर्गत 2 कोटी 50 लक्ष अशी एकूण 615 कोटी 50 लाखांचा नियतव्यय मंजूर आहे. यात सर्वसाधारण अंतर्गत चार 467.70 कोटी रुपयांच्या च्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यंत्रणांना 125.39 कोटी (एकूण रकमेच्या 40 टक्के) निधी वितरित करण्यात आलेला आहे. ज्यात जानेवारी अखेर 123.3 कोटी खर्च झाला आहे.
एकूण आराखड्यातील 536.44 कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली असून त्यातील वितरित एकूण निधी 156.48 कोटी व खर्च 154.3 कोटी इतका आहे.यावेळी आज झालेल्या या बैठकीस व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, तसेच खा. रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, बीडचे पालक सचिव तथा आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे तसेच जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने,पोलिस अधिक्षक नवनित कॉवत व सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांची उपस्थिती होती.नियोजन समिती सदस्यामध्ये आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुरेश धस, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित. बीडमध्ये गुंतवणूकदार येण्यासाठी वातावरण बदलणे आवश्यक आहे या भूमिकेतून काम करा गुंतवणूक येण्यासाठी आवश्यक अशी मुंबई ते बीड थेट रेल्वे सुरू करण्यासोबतच येणाऱ्या काळात बीड साठी विमानतळ देण्याबाबतही सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील यापुढील सर्व जिल्ह्यांचा उर्वरित निधी आढाव्यानंतर मोकळा करू त्यामुळे सर्वांनी आताच कामाला लागावे असेही ते म्हणाले. नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी आधी शहर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्यावे पुढील भेटीत मला संपूर्ण शहर स्वच्छ दिसले पाहिजे असेही श्री पवार यांनी सांगितले.
आज या बैठकीपूर्वी त्यांनी जिल्हयातील सर्व विभागप्रमुखांकडून विविध कामांचा आढावा घेतला व सर्वांनी चांगले काम करावे अशा सूचना देताना कामात दिरंगाई करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशाराही दिला. नियोजन समितीच्या बैठकीत यावेळी प्रशासनातर्फ सर्वांचे स्वागत संविधान देऊन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यावेळी आढाव्याचे सादरीकरण केले. आरंभी सर्वांच्या उपस्थितीत निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता संख्याज्ञान विषयक मिशन जरेवाडी या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.आज 30 जानेवारी हुतात्मा दिन असल्याने बरोबर 11.00 वाजता सर्वांनी 2 मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन या सभेदरम्यान केले.सभेच्या यशस्वितेसाठी जिल्हा नियोजन अधिकारी, डॉ. सुधिर चिंचाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच नियोजन विभागाचे इघारे आणि इतरांनी परिश्रम घेतले.
□ पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पहिलाच बीड दौरा होता.
□ बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लगतच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
□ सभेच्या निमिताने 2 वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्ट सुरु करण्यात आली.
□ बैठकी बाबत सर्वांनाच उत्सुकता होती त्यामुळे विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी
सकाळपासूनच उपस्थित होते.
□ पुढील बैठकीपूर्वी किमान 10 दिवस आधी सदस्यांना इतिवृत्त् कळवून त्याबाबत पूर्वतयारी
आढावा बैठक जिल्हाधिकारी यांनी घ्यावी जेणे करुन मुख्य बैठकीचा वेळ वाचेल,अशी सूचना उपमुख्यमंत्र्यानी यावेळी केली.
□ आजच्या सभेत सर्व आढावा झाल्यानंतर श्री पवार यांनी प्रत्येक सदस्याला म्हणणे मांडण्याची संधी दिली. या सर्व सूचना पालक सचिवांनी आढावा घेत मुंबईत पाठवाव्यात असेही निर्देश यावेळी दिले.