सिटी बसच्या पहिल्या फेरीतून आ.नमिता मुंदडानी केला प्रवास
अंबाजोगाई – मागील अनेक वर्षापूर्वी बंद पडलेल्या अंबाजोगाई शहरातील बस सेवेला आ. नमिता मुंदडा यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आ. मुंदडा यांच्या हस्ते बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
अंबाजोगाई शहराचा वाढता विस्तार आणी नागरीकरण लक्षात घेता शहरांतर्गत बस सेवा अत्यावश्यक ठरत होती. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातून अंबाजोगाईत येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच, अंबाजोगाई हे प्रमुख शैक्षणिक केंद्र असल्याने ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक आहे. सिटी बस अभावी रुग्ण आणि विद्यार्थ्यांना तुलनेत महागड्या असलेल्या खासगी वाहतुक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत होते. त्यासोबतच शहर वाढल्याने नागरिकांनाही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी अल्पदरातील वाहतुक व्यवस्था आवश्यक होती. अंबाजोगाई शहरात अनेक वर्षांपूर्वी शहर बस सेवा कार्यरत होती, परंतु नंतर ती बंद करण्यात आली. रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांची गरज लक्षात घेत आ. नमिता मुंदडा यांनी बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्य परिवहन विभागाचे बीड जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन त्यांनी शहर बस सेवा सुरू करण्याबाबत सूचित केले. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते या बस सेवेला सुरुवात करण्यात आली. आ.मुंदडा यांनी स्वतः बसच्या पहिल्या फेरीतून पत्रकार, कार्यकर्त्यासह प्रवास केला.
असा असणार मार्ग
शहर बस सेवा पिंपळा धायगुडा, भगवान बाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सदर बाजार, स्वाराती रुग्णालय ते छत्रपती संभाजी महाराज चौक मोरेवाडी या दरम्यान सुरू राहणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सकाळी साडेआठ ते दुपारी चार वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. बसचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे आगारप्रमुख राऊत यांनी सांगितले.