पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार
अंबाजोगाई प्रतिनिधी:- अंबाजोगाई शहराला पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळेना.शहरात सर्वत्र पाण्याचा ठणठणाट.धनेगाव येथील धरणात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असताना देखील
अंबाजोगाईकरांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. धरण उशाला, कोरड घशाला म्हणण्याची वेळ अंबाजोगाई शहरातील नागरिकांना आली आहे
सध्या नगर परिषदेत प्रशासक राज असल्याने शहरवासीयांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. नगर परिषदेचा कारभार राम भरोसे असून त्यांना विचारणारे कुणीच नसल्याने पाणीपुरवठा आणि स्वच्छता या महत्त्वाच्या बाबींकडेही नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. अंबाजोगाई शहरात पंधरा दिवस उलटून गेले तरी पाणी येत नाही. नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून असलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागतेय. यासंदर्भात अनेकदा ओरड झाली. मात्र प्रत्येक वेळी नगर परिषद प्रशासक पंधरा दिवस पाणी येत नसल्याचा दावा खोडताना अपयशी ठरली आहे. आम्ही आठ दिवसांनी पाणी देतो, मात्र लोक उगीच ओरडतात अशी भूमिका नगर परिषद पाणीपुरवठा विभागाने घेतलेली दिसून येते. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर कोण आवाज उठवणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
पाणीपुरवठा विभागाला विभागप्रमुख नसल्याने लिपिकाच्या हाती कारभार
गेल्या दोन वर्षापासून नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला पाणीपुरवठा अधिकारी नसल्याने लिपिकाच्या हाती कारभार देण्यात आल्याने पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राजकिशोर मोदीकडून अंबाजोगाईकरांना अपेक्षा
येत्या काही महिन्यावर नगर परिषदेची निवडणूक लागू शकते त्याअनुषंगाने राजकिशोर मोदींनी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न असो की पाणी पुरवठ्याचा प्रश्न असो यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेच्या प्रशासकासोबत चर्चा करून नागरिकांचा प्रश्न सोडवा अशी अपेक्षा अंबाजोगाईकर नागरिक राजकिशोर मोदीकडून करू लागले आहेत.