राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अंबाजोगाई:- बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्याविषयी आक्षेपार्ह, वादग्रस्त व गैर कायदेशीर भाषेचा वापर करून लोक प्रतिनिधीचा अपमान करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडेला तात्काळ सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने मंगळवार, दिनांक ७ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर दगडुसाहेब देशमुख यांनी मागणी करून दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, लोकसभेतील बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे विरूद्ध पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे याने अश्लील, अभद्र, अपमानास्पद अशा भाषेचा वापर करीत बीड पोलिस दलातील पोलिस अधिक्षक यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या ‘बीड पोलिस प्रेस’ या ग्रुप वरून सदर आक्षेपार्ह मजकुर प्रकाशित करून बीड जिल्ह्याचे लोक प्रतिनिधी असलेले विद्यमान खासदार यांचा अपमान करून स्वतः फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे. सदर पोलिस अधिकारी हा कायदेशीर पदावर नियुक्त असताना व सदर प्रकार गुन्ह्याच्या सदरात मोडतो हे माहित असताना ही त्याने जाणिवपुर्वक हा गुन्हा केलेला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस दलाची प्रतिमा मलीन झालेली आहे. ही बाब बीड पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना ज्ञात झालेली आहे. तरी सुद्धा सदर इसम गणेश मुंडे याचे विरूद्ध फौजदारी गुन्ह्याची नोंद अद्यापपर्यंत झालेली नाही. सदर गणेश मुंडे याने लोक प्रतिनिधीचा अपमान करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्यामुळे त्याचेविरूद्ध योग्य व आवश्यक गुन्ह्याची नोंद करून गणेश मुंडे यास तात्काळ पोलिस दलातून बडतर्फ करण्यात यावे, सदर निवेदनाची दखल घेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे याचेविरूद्ध मागणी प्रमाणे आवश्यक कार्यवाही न झाल्यास या विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, दिपक शिंदे, ऍड.प्रशांत पवार, ऍड.अविनाश भोसले, ऍड.शहाजहान खान पठाण, ऍड.इस्माईल गवळी, अमोल चव्हाण, तानबा लांडगे, यशोधन लोमटे, रोहित हुलगुंडे, ईश्वर शिंदे, प्रमोद भोसले, राहुल सिरसट, रविंद्र मोरे, जनक गडकर, गणेश घाडगे, किशोर उंडरे, दिपक बेले, आश्रुबा करडे, अतुल साखरे, किरण पवार, विजय चव्हाण, विष्णू बरकते, पंकज मोरे, रमेश कदमआदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.