आ.नमिता मुंदडा विधानसभेत कडाडल्या; अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याचा तपास करण्याची केली मागणी
अंबाजोगाई – बीड जिल्ह्यातील सर्वात शांत मतदार संघ म्हणून केज मतदार संघाची ओळख होती. मात्र, मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर ही ओळख संपली आहे. या अमानुष घटनेमुळे बीड जिल्ह्यातील नागरिकात प्रचंड भीतीचे वातावरण असून जनतेचा पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी अद्यावत तंत्रज्ञानाचा वाप करून या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश द्यावेत आणि आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी विधानसभेत केली. यासोबतच परभणी शहरात संविधानाची झालेली विटंबना निषेधार्ह असल्याचे सांगून पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी देखील आ.मुंदडा यंनी केली.
बुधवारी (दि.१८) संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विशेष चर्चा झाली. यावेळी आ. नमिता मुंदडा यांनी जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे भयाण वास्तव सभागृहासमोर ठेवले. आ. मुंदडा म्हणाल्या की, मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येला दहा दिवस उलटले आहेत. एवढ्या क्रूर घटनेनंतर बीड जिल्ह्यातील नागरिकात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. ज्या संथगतीने आणि चालढकल करून या प्रकरणाचा तपास सुरु आहे त्यामुळे जनतेचा पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर विश्वास राहिला नाही. आतापर्यंत केवळ चार आरोपींनाच पोलीस अटक करू शकले आहेत. सर्व आरोपीबाबत इत्यंभूत माहिती पोलिसांना आहे. तरीसुद्धा तीन आरोपी अद्यापही पोलिसांना सापडू शकले नाहीत. यावरून जिल्हा पोलीस किती संवेदनशील (?) आहेत हे दिसून येत आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कोणीतरी कंट्रोल करतंय अशी शंका नागरिकांना आहे. त्यामुळे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआय सारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना लवकर शोधण्याचे आणि वेगाने तपास करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत आणि सर्व आरोपींना फाशीसारख्या कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवावे अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली. दरम्यान, सत्ताधारी पक्षात असूनही आ. मुंदडा यांनी मस्साजोग प्रकरणात घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.
संविधानाची विटंबना निषेधार्ह – आ.मुंदडा
बुधवारी अल्पकालीन चर्चासत्रात आ.नमिता मुंदडा यांनी परभणी शहरात संविधानाची झालेली विटंबना निषेधार्ह असल्याचे मत सभागृहात व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आपला देश चालतो. या संविधानाचा सन्मान राखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. संविधान हे आपल्या लोकशाहीचा महत्वाचा आधारस्तंभ आहे. आपले मुलभूत अधिकार, न्याय आणि स्वातंत्र्य हे संविधानामुळेच आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे हे आपले परमकर्तव्य आहे. त्यामुळे परभणी सारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर कायदा करण्यात यावा. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली.