फराळाची तयारी पूर्ण, गुरुवारी ५०० कुटुंबांना होणार वाटप
अंबाजोगाई, दि. २९ (प्रतिनिधी) सर्वसामान्यांसोबत वंचित घटकांचीही दिवाळी गोड झाली पाहिजे, या उद्देशाने येथील आधार माणुसकीचा उपक्रमातील ५०० कुटुंबांना दिवाळीचा फराळ देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी (दि.३१) मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिवाळीचा फराळ वाटप केला जाणार असल्याची माहिती ॲड. संतोष पवार यांनी दिली. बीड, लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुंटूबांना शैक्षणिक, आरोग्य विषयक आधार देण्याचे काम संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थांतर्गत आधार माणुसकीचा उपक्रमांतर्गत केले जाते. त्यांचा दिवाळीचा सणही उत्साहात साजरा होण्यासाठी या कुटुंबांना दरवर्षी फराळ दिला जातो. यात कोरोनाग्रस्त, एड्स बाधीत कुटुंबाचाही समावेश असतो.
या ५०० कुटुंबाना फराळ देण्यासाठी मागील तीन दिवसापासून तयारी सुरू होती. मंगळवारी या फराळाची पॅकिंग पूर्ण झाली. यासाठी श्रीपतरायवाडी येथील बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला.गुरुवारी येथील बीड रोडवरील सायली मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात या फराळाचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमास युवा वक्ते अविनाश भारती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. लातूरच्या आर. सी. सी. क्लासेसच्या संचालिका मिनल शिवराज मोटेगावकर, उद्योजक दुर्गा तुकाराम पाटील, प्राचार्या अखिला सय्यद गौस, प्रा. डाॅ. सुवर्णा विष्णु तायडे, स्त्रीरोग तज्ज्ञ रेखा प्रल्हाद गुरव, वर्षा जगजित शिंदे, उद्योजक रक्षा धनराज सोळंकी, पोदार स्कूलच्या सचिव सावली मनोज गित्ते, प्रियदर्शनी अभ्यासिकेच्या संचालक ज्योती अभिजित गाठाळ, कल्पना अमृत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांच्यासह चांगुलपणा चळवळ व मैत्री ग्रुपने केले आहे.