मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला पुरस्कार
अंबाजोगाई प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने गणेश मंडळासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत अंबाजोगाई येथील सरस्वती गणेश मंडळाने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळविला. २५ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र असा हा सन्मानाचा पुरस्कार गणेश मंडळाचे अध्यक्ष कुलदिप परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार कार्यक्रमात स्विकारला.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने काही निकष घालून राज्यातील गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या संदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०२४ मधील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पारितोषिक विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नावे जाहीर करण्यासाठी काढलेल्या आदेशात पुढे असे म्हटले आहे की, आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, सण उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपली जावी व पर्यावरण पुरक सण साजरे व्हावे तसेच गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे याकरीता राज्य शासनाने दिनांक ०७.०९.२०२४ ते दिनांक १७.०९.२०२४ या कालावधीत पार पडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात, राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये घेतला होता. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०२४ मधील राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये ५.०० लक्ष, व्दितीय क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये २.५० लक्ष व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये १.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरीय पारितोषिक विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांस प्रत्येकी रुपये २५,०००/- चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. दिनांक ०७.०९.२०२४ ते १७.०९.२०२४ या कालावधीत पार पडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नावांची शिफारस संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये गठीत जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय निवड समितीने केली असून, त्यानुसार स्पर्धेतील विजेत्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नावे घोषित करण्याची विनंती संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांनी संदर्भ क्र.३ च्या पत्रान्वये केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०२४ मधील विजेत्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नावे घोषित करण्यात आलेल्या यादीत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील सरस्वती गणेश मंडळास जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०२४, मधील विजेत्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम ०९ ऑक्टोबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा (प), मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सरस्वती गणेश मंडळाचे अध्यक्ष कुलदिप परदेशी व निलेश मुथा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्विकारला.