चार दरवाजे उघडे, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
केज:-धनेगावं येथील मांजरा धरण हे ओव्हरफ्लो झाले असून बुधवारी दुपारी १२.३० वाजेपासून दोन दरवाजे तर दुसऱ्या दिवशीपासून चार दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग केला जात होता. तर गुरुवारी मध्यरात्री आणखी दोन दरवाजे उघडून शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत सहा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर दोन दरवाजे बंद करून चार दरवाज्यातून विसर्ग सुरू आहे.
धनेगाव येथील मांजरा धरणात १५ ऑगस्ट पर्यंत केवळ ३ टक्के जिवंत पाणी साठा होता. त्यानंतर नियमितपणे पडत गेलेल्या पावसाच्या पाण्यामुळे मांजरा नदीतून धरणात पाणी साठ्यात भर पडत गेली. त्यामुळे अवघ्या ४१ दिवसात धरण हे ३ टक्क्यांवरून १०० टक्के भरले. धरण हे ओव्हरफ्लो झाल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने बुधवारी दुपारी १२.३० वाजता धरणाचे द्वार क्र. १ व ६ असे दोन दरवाजे उघडून १७०० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू केला जात होता. त्यानंतर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आणखी दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला. गुरुवारी सायंकाळी ६.३० धरणाचे द्वार क्र. ३ व ४ हे दोन दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला. तर पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी रात्री १२ वाजता आणखी द्वार क्र. २ व ५ हे दोन दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी १ वाजता पाण्याची आवक कमी होताच परत द्वार क्र. २ व ५ हे दोन दरवाजे बंद करण्यात आले आहेत. इतर चार दरवाज्यातून ३४९४ क्यूसेसने पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात केला जात आहे. तर नदी काठावरील गावाच्या नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखाधिकारी सुरज निकम यांनी दिली.