केज – एका इयत्ता पाचवीच्या मुलास चॉकलेटचे आमिष दाखवून पाठलाग करीत अपहरण करण्याचा प्रयत्न करताना पकडलेल्या एकास नातेवाईक व नागरिकांनी चांगला चोप दिल्याची घटना केज शहरात सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या धनराज वळसे व विजय गोपीनाथ भंडारी या दोघांना मंगळवारी कोर्टासमोर हजर केले. त्या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
केज शहरातील भीमनगर भागातील अंकुर परमेश्वर मस्के (वय ११) या शाळकरी मुलाचा चार दिवसांपासून शाळेत जाताना पाठलाग करीत चॉकलेटचे आमिष दाखवून कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला जात होता. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शाळेकडे निघालेल्या अंकुर या पुन्हा कारमध्ये बळजबरीने बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न करीत अंकुरच्या पाठीमागे आलेले त्याचे वडील परमेश्वर मस्के, प्रबुध्द बनसोडे, सुनीता कांबळे या नातेवाईकांनी विजय गोपीनाथ भंडारी (रा. सणसर ता. इंदापुर जि. पुणे) यास पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर कारमध्ये बसलेला कारचा मालक धनराज वळसे (रा. केज) व अनोळखी दोघे हे पळून गेले. अशी तक्रार अंकुरचे वडील परमेश्वर मस्के यांनी दिल्यावरून धनराज वळसे, विजय भंडारी व अनोळखी दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी धनराज वळसे यास अटक केली होती. फौजदार राजेश पाटील हे तपास करीत आहेत.