अंबाजोगाई:- कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांची 108 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार नमिता मुंदडा यांनी सांगितले की, बदलत्या काळाच्या गरजेनुसार कृषि विज्ञान केंद्राचे महत्व वाढत आहे. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेती केली पाहिजे. शेती क्षेत्रात मोठा बदल करण्यास संधी आहे. कृषी पणन व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्राधान्याने काम करत आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नशील राहून अंत्योदयाचा विचारांचा अंगीकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पं. दीनदयाल उपाध्याय यांची 108 वी जयंती समारोह आणि देशभरातील कृषि विज्ञान केंद्र यंत्रणेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष (1974 -2024) यानिमित्त कृषि विज्ञान केंद्र येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांची उपस्थिती होती. उद्घाटक म्हणून विधानसभा सदस्य आमदार नमिता मुंदडा यांची उपस्थिती हिती. पुणे येथील ‘एकात्म मानवदर्शन’ विषयाचे अभ्यासक हरि मिरासदार, अजय महाजन, कृषी महाविद्यालय अंबाजोगाई सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेश महाजन, श्रीम. संध्या कुलकर्णी व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांची मंचावर उपस्थित होती
प्रास्ताविक करताना डॉ. देशमुख यांनी सांगितले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकाला समजावे व त्यांच्या कार्याला दिशा मिळावी, यासाठी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान प्रसार, पीक उत्पादकता वाढ यासाठी केंद्र काम करीत आहे. भारत देशात कृषि विज्ञान केंद्र यंत्रणा स्थापन होऊन 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी व्यावसायिक दुग्धोत्पादन विषयाचे प्रशिक्षण घेतलेल्या ग्रामीण युवकांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच शेततळ्यातील पाणी व्यवस्थापन विषयावरील घडी पत्रिकेचे प्रकाशन संपन्न झाले
डॉ. महाजन यांनी बोलताना सांगितले की, कृषि विज्ञान केंद्र विस्तार कार्यातील महत्त्वाचा घटक असून कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी केंद्रावर शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी येतात. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र महत्त्वाची यंत्रणा असल्याचे त्यांनी सांगितले.
मिरासदार यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानवदर्शन’ विषयावर सविस्तर विवेचन केले. भारत देशाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी एकात्म मानवदर्शन विचारधारा अधिक कृतीशील असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांच्या आधारावर नानाजी देशमुख यांनी संस्था उभारली आहे. कार्याचा अनुकरणीय नमुना उभारणारे तंत्रज्ञान समाजामध्ये रुजवण्यासाठी केंद्र काम करत आहे. ग्रामीण स्थलांतराने बीड जिल्हा प्रभावित आहे, त्यासाठी कृषि विज्ञान केंद्र ने विशेष उपक्रमाच्या माध्यमातून काम केले आहे. दीनदयल उपाध्याय जयंती साजरी करणे म्हणजे भारतीय विचारप्रणालीवर अधिकचा भर देणे होय, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्रज्ञ पीकविद्या कृष्णा कर्डिले व आभार शास्त्रज्ञ पिक संरक्षण डॉ. प्रदीप सांगळे यांनी केले.